
आज शिवपुत्र संभाजी राजे यांची ३५५ वी जयंती त्यांच्या जीवनावरील विश्वास पाटील यांनी लिहिलेले संभाजी प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे नितांत सुंदर पुस्तक .................
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी, कवी-राज्यकर्त्यांची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!
आजचे अग्रगण्य रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांना सह्याद्रीच्या निबिड दर्याखोर्यांनी, सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथराक, वादळी, पण वास्तव गाथा!!
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा आपल्या तलवारीच्या बळावर संभाजी महाराजांनी विस्तार केला. स्वराज्यातला एकही किल्ला गमावला नाही की आरमारातले एकही जहाज बुडू दिले नाही. पण त्याच वेळी कावेरीच्या महापात्रात घोडी घातली. कर्नाटकातील राज्य दुप्पट केले. त्रिचनापल्लीच्या पाषाणकोटाला सुरुंग लावले. जंजिर्याच्या सिद्दीला जेरीस आणले. पोर्तुगीज व्हॉइसरॉयला होडक्यात बसून पळायला लावले. त्यांचे तीन चतुर्थांश राज्य स्वराज्याला जोडले. व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांच्या वखारींची लांबी-रुंदी किती असावी, याचे निर्बंध प्रथम संभाजीराजांनी घातले. वसीपासून पणजीपर्यंत किनारपट्टीवर जरब बसवली. मुख्य म्हणजे पाच लाख सैन्यासह तळ ठोकून असलेल्या औरंगजेबाशी आठ वर्षांहून अधिक काळ अनेक आघाडयांवर त्यांनी लढा दिला. छत्रपती संभाजीराजांचे योद्धेपण अशा अनेक मोहिमांमधून सिद्ध झाले आहे. ही वीरगाथा विश्वास पाटील यांनी 'संभाजी' या कादंबरीतून गाईली आहे.
ज्याच्याकडे शिक्षा करण्याचे अधिकार असतात, त्याच्याकडे क्षमा करण्याएवढे उदार अंत:करण असावे लागते. संभाजीराजांपाशी अशी उदारता निश्चित होती. संभाजीराजे छत्रपती झाल्यानंतर हिर्यांनी भरलेले दोन पेटारे चोरताना हिरोजीबाबा फर्जंद पकडले गेले. शिवाजीमहाराजांनी आग्य्राहून सुटका करून घेताना हिरोजीबाबांचे साह्य घेतले होते. महाराजांच्या जागी हिरोजीबाबाच आजारी असल्याचे सोंग करून पडलेले होते. हे जाणून संभाजीराजे हिरोजीबाबांना म्हणाले, ''फर्जंदकाका, नुसती इच्छा प्रदर्शित केली असती तरी आपल्या पायावर अख्खा खजिना रिता केला असता! असे चोरचिलटांचे मार्ग कशासाठी अवलंबिलेत?'' त्यांना या गुन्ह्याबद्दल संभाजीराजांनी उदार अंत:करणाने माफ केले.
अष्टप्रधानांनाही त्यांनी एकदा माफ केलेले दिसते. स्वराज्याच्या उभारणीत छत्रपती शिवरायांबरोबर अष्टप्रधानांनी कष्ट झेलले होते, पण नंतरच्या काळात थोडी स्थिरता आल्यावर त्यांचा स्वार्थ जागा झाला. साहजिकच संभाजीराजांचा स्पष्टवक्तेपणा त्यांना रुचत नव्हता. अष्टप्रधानांचा इंग्रजी व्यापार्यांकडून बक्षिसी मिळवण्याचा प्रयत्न युवराज संभाजी यशस्वी होऊ देत नसत. त्यामुळेच संभाजीराजांना छत्रपती होण्यापासून दूर ठेवण्याचा कट त्यांनी रचला होता. सेनापती हंबीरराव मोहिते यांनी आपल्या सख्ख्या भाच्याला- राजाराम राजांना- छत्रपती करण्याएएवजी संभाजीराजांना छत्रपती करण्याचा कौल दिला आणि कट उधळला. अष्टप्रधानांनी औरंगजेबाला निष्ठा वाहिली होती. पण संभाजीराजांनी एकदा त्यांना माफ केले. कारभार्यांनी पुन्हा गद्दारी केल्यानंतर त्यांना हत्तीच्या पायी दिले. एकाच वेळी मृदू व कठोर अशी दोन रूपे संभाजीराजांमध्ये वसत होती, याची अनेक उदाहरणे समोर येतात.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभर-सव्वाशे वर्षांनी लिहिलेल्या बखरींमध्ये त्यांच्याविषयी एकांगी व विपर्यस्त चित्रण केलेले आढळते; तसेच कनोजी कलुषाविषयीही चुकीचे लिहिलेले आढळते. कनोजच्या या ब्राह्मणाने संभाजीराजांना काव्यशास्त्रनपुण केले होते. रणांगणात तलवार गाजविली होती. रायगडावर आक्रमण करून आलेल्या औरंगजेबाच्या सैन्याला पळताभुई थोडी केली होती. कलुषाला मोगलांनी हालहाल करून मारले. तापलेली सळी डोळ्यात खुपसली गेल्यानंतरही हा कवी हिमतीने काव्यगायन करीत होता. म्हणून त्याची जीभ कापण्यात आली. या लढवय्याचे मर्मग्राही चित्रण या कादंबरीत येते.
येसूबाईच्या हाती राज्यकारभार सोपविणारा आणि स्वत: रणांगण गाजवणारा वीर संभाजीराजा येथे भेटतो. दुष्काळात दोन वर्षे किल्ल्यांवर व रयतेला पुरेशी रसद पुरविणारा जाणता राजा येथे दिसतो. नद्यांवर धरणे बांधणारा राजा समोर येतो. मित्रासाठी लढणारा कलुषा भेटतो. स्वराज्यावर प्रेम करणारी गोदू मनाला चटका लावून जाते. 'संभाजी' ही कादंबरी म्हणजे एका शूराचा पोवाडाच आहे
No comments:
Post a Comment